top of page

' विडा '



ree

‘विड्याचे पान’ म्हटलं की सगळ्यात पहिलं आठवतं ते अमिताभ बच्चनवर चित्रित झालेलं व किशोरदांनी गायलेलं 'खायके पान बनारसवाला' हे अफलातून गाणं! विड्याच्या पानांसारखंच सदाबहार... हे ‘बनारसी पान’ जसं सुप्रसिद्ध आहे तश्याच विड्याच्या पानांच्या अनेक प्रजाती आहेत. आमच्या आईच्या बागेतही 'खायच्या विड्याच्या पानांचा वेल' अर्थात 'नागवेल' आहे; नक्की कोणत्या प्रजातीचा आहे हे ठाऊक नाही पण चव मात्र अस्सल जहाल आहे. आणि यंदाच्या वर्षी या वेलाने चांगलंच बाळसं धरलंय. गेल्या काही वर्षांपासून हे रोप आहे बागेतल्या कुंडीत; पण केवळ अस्तित्व टिकवून. त्याची वाढ काही मनासारखी होत नव्हती. मात्र  गेल्या काही महिन्यांपासून विड्याच्या पानांचा वेल अगदी छान बहरलाय व त्याने आपला पसाराही वाढवलाय. विड्याची ती मोठाली हिरवीकंच पाने व तितकीच तीव्र त्यांची चव... अहाहा!! नुसतीच खाल्ली तर तिखट चवीने ठसका लागावा अशी पण बडीशेप, सुपारी अन गुलकंद टाकून छान विडा बनवून खाल्ला तर वाह!! क्या बात है!!

‘विडा’ म्हटलं की त्याच्या नाना छटा डोळ्यांसमोर येतात; मग तो ‘खाण्याचा विडा’ असो वा  ‘मानाचा विडा’, ‘पूजेतला विडा’ असो वा ‘पैजेचा विडा’... शब्द तर आहे छोटासा केवळ दोन अक्षरी पण किती मोठ्ठा आवाका आहे ना विड्याचा...

आपल्या देशात तसे विड्याच्या पानांचे फारच महत्व. मुखवासात तर त्यास विशेष स्थान! सण-समारंभांमध्ये जेवणानंतर विड्याचे पान खाल्ले जातेच. विशेषतः मांसाहाराच्या जेवणानंतर जर विड्याचे पान नसेल तर जेवण अपूर्ण झाल्यासारखेच वाटते. पण बरेचदा विडा खाणं ही वाईट सवय समजली जाते. परंतु खरंतर,  पान खाणं ही वाईट सवय नाही उलट विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं; त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. म्हणूनच, विड्याच्या पानाचा वापर प्राचीन काळापासूनच औषधांसाठी केला गेलाय. हो पण हेदेखील तितकच खरं आहे की जर विड्याच्या पानात तंबाखुसारखे नशायुक्त पदार्थ मिसळून खाल्ले तर मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. जर विड्याच्या पानांचे योग्य प्रकारे सेवन केले तर मात्र ते बहुगुणी आहे. अगदी, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून ते दात-हिरड्यांचे दुखणे, तोंड येणे, गुढघेदुखी, अपचन - निद्रानाश या साऱ्या आजारांवर विड्याचे पान अत्यंत गुणकारी आहे. म्हणूनच, सध्याच्या कोरोनाच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आम्ही बागेतल्या वेलीवरची ही विड्याची ताजी पाने रोज जेवणानंतर आवर्जून खात आहोत आणि ही सवय कोरोना गेला तरी यापुढेही कायम ठेवू. मला तर गुलकंद घातलेले 'मिठा पान' फारच आवडते.

'मिठा पान' वरून अलीकडेच घडलेली एक छानशी आठवण आठवली. आमच्या लग्नानंतर पाच परतवणाच्या दिवशी जेव्हा आम्ही सगळे माझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा जेवण झाल्यानंतर माझ्या आईने तिच्या बागेतून काढलेली विड्याची अगदी ताजी हिरवीगार पाने, बडीशेप आणि बागेत उमललेल्या गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यापासून घरीच बनवलेला 'Home made गुलकंद' यांनी भरलेले ताट माझ्या सासरच्या मंडळीं समोर आणून ठेवले तेव्हा सर्वांनी या घरीच बनवलेल्या विड्याचा मनमुराद आनंद लुटला. परंतु नवर देवाने (म्हणजेच माझ्या अहोंनी हो) मात्र जणू विडा खाण्याचा विडाच उचलला होता. तो सर्वांना विडा बनवूनही देत होता आणि देता देता विडा कसा खावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा बहाणा करत स्वतःही खात होता. ते पाहून माझा मामा गमतीने म्हणाला देखील की " जावई बापू तर आज विडा खाण्याचा रेकॉर्डच करत आहेत. सासूबाईंच्या बागेतील विड्याची पाने त्यांना इतकी आवडली आहेत की त्यांनी जेवणापेक्षा विडाच जास्त खाल्ला आहे". 

तर असे हे विड्याचे पान, ज्याचे 'औषधी' महत्व जितके, तितकाच मान त्यास शुभकार्यांमध्येही! विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून देवासमोर पूजा मांडली जाते तेव्हा त्याचे 'सात्विक' रूप जाणवते आणि याच पानांच्या विड्याचा आस्वाद घेत, जेव्हा एखादा दर्दी कलाकार संगीताची मैफिल वा लावणीची बैठक रंगवतो तेव्हा विड्यास 'रसिकते'ची झालर प्राप्त होते. प्रत्येकातील खिलाडू वृत्ती जपणारा 'पैजेचा विडा' ही तोच...  कात घातलेले विड्याचे पान चघळले की रंग कसा अधिकाधिक गडद होत जातो तसेच 'पैजेचा विडा' उचलून, तो समर्थपणे पेलला तर माणसातील खिलाडूवृत्तीही वृद्धिंगत होत जाते. आपल्यातील अंगीभूत गुणांना जणू प्रोत्साहनच देत असतो हा 'पैजेचा विडा'. त्यामुळे, जसा 'खाण्याचा विडा' हा आपल्या शारिरीक आरोग्यासाठी गुणकारी तसाच 'पैजेचा विडा' देखील आपल्या बौद्धिक- मानसिक विकासासाठी गरजेचा आहे असं म्हणायला हरकत नाही. 

लग्न लागताना नवरदेव आणि नवरीमुलीच्या तोंडातही दाताखाली 'विडा' पकडायला देतात जो न चावता लग्न लागल्यावर फेकून द्यायचा असतो. या गमतीदार प्रथेचे प्रयोजन मात्र मला आजतागायत कळलेले नाही. तरीही आमच्या लग्नातही आम्ही लग्न लागताना गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज्ञाधारकपणे या प्रथेचे पालन केले.

या विड्याच्या पानांकडे पाहिलं ना की मला अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे, 'विड्याला हे जसे अगदी विभिन्न पैलू आहेत व आपल्या आयुष्यात तो जसे रसिकतेचे रंग भरतो; तशीच आपल्या आयुष्यात काही माणसे असतात-येतात, अगदी या विड्याच्या पानांसारखी!! विडा जितका चघळावा तितका त्याचा रंग खुलत जातो तशीच ही 'काही माणसे'... जितकी वाचावी-समजावी-अनुभवावी तितकी आपल्या मनांत ठळक होत जातात, आपल्या आयुष्याचे रंग अधिकाधिक खुलवण्यात यांचे मोलाचे योगदान असते, कधी सात्विक अनुभूती देत साथ देतात तर प्रसंगी जहाल तिखट होऊन योग्य मार्गही दाखवतात. खरंच, अशी 'विड्याच्या पानां'सारखी माणसे असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि असायलाच हवीत; आपल्या मनाचे आरोग्य निकोप- निरोगी राहण्यासाठी व आपल्या आयुष्याचे रंग खुलवण्यासाठी...

या माझ्या विचार मंथनातून एक गोष्ट मात्र मला जाणवली की वर उल्लेखलेल्या सर्वच प्रकारच्या 'विड्या'ना आपल्या आयुष्यात किती महत्व आहे. खाण्याचा असो, पैजेचा असो वा माणसातील असो... काय मग, विचार केलात का तुमच्या आयुष्यातील अशी 'विड्याची पाने' कोणती? आठवा, साठवा अन त्यांना जपून ठेवा...   

-    Ar. अनुजा पांचाळ नारकर

Comments


bottom of page