top of page

बिनरंगांची होळी??

काल बोलता बोलता मला नवऱ्याने सहज विचारले की 'काय मग उद्या बिन रंगांची होळी खेळणार का?' अन् माझ्यासारख्या रंगांचे जबरदस्त आकर्षण असणाऱ्या मनात एकदम प्रश्नचिन्ह उभे राहिले... 'बिन रंगांची होळी ? कसं शक्य आहे?' अन् मग मनात विचारांनी गती घेतली...

खरं तर, मला रंगांचे जरी खूप आकर्षण असले तरी मला रंग खेळायला फारसे आवडत नाहीत आणि खरे पाहता, आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार होळी वा धुळवड ही मुळात बिन रंगांचीच खेळली जात असे. आदल्या दिवशी पेटलेल्या होळीमध्ये, दुसऱ्या म्हणजेच धुळवडीच्या दिवशी जी रक्षा (राख) उरत असे त्याने खरी धुळवड खेळली जात असे. एकतर, ही राख औषधी असे कारण होळीत लाकडासोबत कापूर, वेलची, कडुनिंब अश्या अनेक औषधी गोष्टीसुद्धा अर्पण केल्या जात असत अन् अशा धुळवडीत कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर होत नसे. त्यामुळे केवळ ' राखाडी ' या एकाच रंगाचा वापर पारंपरिक धुळवडीत होत असे, असे म्हणायला हरकत नाही. 

काळानुरूप, सणांच्या रीती- पद्धती बदलत गेल्या अन् धुळवडीपेक्षा रंगपंचमी जास्त लोकप्रिय होऊ लागली. करड्या रंगाच्या राखेची जागा, नानाविध कृत्रिम रंगांनी घेतली अन् धुळवडी पेक्षा  रंगपंचमीच मोठ्या प्रमाणावर साजरी होऊ लागली. 

अर्थात, रंग असतातच तसे... आकर्षित करणारे, ओढ लावणारे... रंग नसतील तर किती बेरंगी, निरस, बेचव होईल नं आपलं आयुष्य... निसर्ग तर रंगांची मुक्तहस्ताने उधळण करत असतो. कित्ती नानाविध रंग आहेत ना अन् प्रत्येक रंगांच्या ही किती साऱ्या छटा!! तरीही प्रत्येक रंगांचे स्वतंत्र अस्तित्व अन् महत्त्वही तितकेच... निसर्गाच्या कॅनव्हास वर हिरव्या रंगाच्या झाड - पानांचे जितके महत्त्व तितकेच निळ्याशार समुद्राचे... आकाशी रंगाच्या निरभ्र आकाशाचा रंग जितका महत्त्वाचा तितकाच भरून आलेल्या आभाळाचा करडा रंगही महत्त्वाचा, आणि तोच रंग जेव्हा सोनेरी पिवळसर केशरी रंगात परिवर्तित होतो तेव्हा सूर्योदय व सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य पाहवयास मिळते. पहाडाचा, डोंगर - दर्यांचा रंग कसा रांगडा तांबडा लालसर अन् तोच जेव्हा बर्फाची शाल पांघरतो तेव्हा पांढरा शुभ्र हिमालयाचे मनोहारी दर्शन घडवतो. इंद्रधनूचे, भाज्या - फळा - फुलांचे, फुलपाखरांचे तर रंग अगणित... पण तरीही जेव्हा सगळे रंग एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समरसतेतून तयार होणाऱ्या पारव्या ( पांढरा) रंगाचे महत्त्वही तितकेच... अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सृष्टीतील या साऱ्या रंगांची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला जे नेत्र लाभलेले आहेत त्यांतल्या सफेद रंगातही एक छोटासा काळा ठिपका असल्याशिवाय रंगांची ही किमया अनुभवणे केवळ अशक्यच... त्यामुळे धवल रंगाइतकेच श्यामल- कृष्ण रंगासही तितकेच महत्त्व!!

तेव्हा आयुष्यातून रंग वेगळे करणं वा कोणताही रंग वगळून टाकणे निव्वळ अशक्य!! होळी, दिवाळी यांसारखे सण रंगांशिवाय साजरे करण्याची कल्पनाही करवत नाही... पण मग जर निसर्ग आपल्यावर रंगांची इतकी सढळपणे उधळण करीत असतो तर मग आपण का बरे कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर करून रंगपंचमी खेळतो? त्यापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करून वा पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून सात्विक पद्धतीने होळी व धुळवड साजरी करता येईल. 

निसर्गातील रंग आपण होळीसाठी कसे वापरू शकतो ते जरा पाहुया;

१. तांबडा रंग - जास्वंदीची फुले किंवा गुलमोहोरची फुले रात्रभर पाण्यात ठेवून तयार करता येतो.

२. नारिंगी रंगाची झेंडूची फुले पाण्यात रात्रभर भिजवून केशरी रंग मिळतो.

३. पिवळा रंग - हळद पाण्यात टाकून किंवा झेंडूची फुले गरम पाण्यात काही तास ठेवून तयार करू शकतो.

४. हिरवा रंग - पालेभाज्या निवडून झाल्यावर उरलेल्या भाज्या जर वाटून घेतल्या आणि पाण्यात मिसळल्या तर हिरवा रंग तयार करू शकतो.

५. निळा रंग - गोकर्णची किंवा नील मोहोर ची फुलं कोमट पाण्यात रात्रभर पाण्यात ठेवून निळा रंग मिळू शकतो.

६. काळा रंग - आवळ्याची पावडर रात्रभर लोखंडी भांड्यात भिजत घालावी आणि सकाळी पाणी टाकल्यास काळा रंग मिळतो.

७. गुलाबी रंग - बीट किसून पाण्यात टाकून ठेवल्यास गुलाबी रंग तयार करता येवू शकतो.

तेव्हा, आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार व आपल्या निकटवर्तीयांसोबत सुरक्षित होळी साजरी करूया अन् सणाचा खराखुरा आनंद लुटुया व जीवन रंगीत करूया!! 

सर्वांना होलिकोत्सवाच्या व धुळवडीच्या नैसर्गिक - सात्विक - बहुरंगी शुभेच्छा!! 🤗

 

Ar. अनुजा निखिल नारकर


ree

 

Ar. अनुजा निखिल नारकर

Comments


bottom of page